अनाथांना स्वनाथ करण्याचे काम करते स्वनाथ फाउंडेशन- मंत्री अदिती तटकरे
मुंबई: अनाथांना स्वनाथ करण्याचे काम स्वनाथ फाउंडेशन करते अशा शब्दात महिला व बालकल्याण मंत्री ना. अदिती तटकरे यांनी संस्थेचे कौतुक केले. दोन दिवसीय दत्तक संगोपन कार्यशाळेला संबोधित करताना मंत्री तटकरे बोलत होत्या.
स्वनाथ फाऊंडेशनने कमी कालावधीत अनाथ बालकांसाठी उल्लेखनीय काम केले आहे. शासनाकडून या कामासाठी सहकार्य करण्यात येत असून शासन आणि स्वनाथ फाउंडेशन यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला आहे. समाजात काम करण्यासाठी अशा पद्धतीने काम करणाऱ्या संस्थांनी पुढे येण्याची आवश्यकता आहे. याबाबत स्वयंसेवी संस्थाकडून काही सूचना आल्या, तर शासन त्यावर उपाययोजना व नव्याने राबविण्यात येणाऱ्या योजनांसाठी काम करेल, असेही मंत्री कु. तटकरे यांनी उपस्थितांना आश्र्वासित केले.
स्वनाथ फाऊंडेशनच्या संस्थापक विश्वस्त श्रेया भारतीय यांनी आपल्या भाषणात कार्यशाळा आयोजित करण्यामागची भूमिका स्पष्ट केली. अनाथ मुलांचे संगोपन करण्याविषयी पालकांना पडणाऱ्या अनेक प्रश्नाचे समाधानकारक उत्तर देण्याबाबत या कार्यशाळेत मार्गदर्शन करण्यात येणार असल्याचे श्रीमती भारतीय यांनी सांगितले. अनाथाश्रमात राहणाऱ्या ६ ते१८ वर्षे वयोगटातील मुलांचे उत्तम पालन पोषण होण्यासाठी पालकांनी पुढे यावे. अनाथ मुलांना एकाप्रकारे प्रतिपालक मिळावे यासाठी शासनाच्या मदतीने स्वनाथ काम करते. तात्पुरत्या पालकत्वाखाली मुलांना किमान दोन वर्षे कुटुंबात ठेवता येते. या दरम्यान मुले आणि पालक दोघेही आनंदी असतील तर कालावधी वाढविता येतो. पालकांची इच्छा असेल तर ते सदर मुलाला कायदेशीर दत्तक घेऊ शकतात, अशी माहिती श्रीमती भारतीय यांनी आपल्या भाषणात दिली.
सध्या समाजातील वस्तुस्थिती सांगत असताना संस्थेचे संचालक गगन महोत्रा यांनी, अनेक जोडप्यांना मुलं हवी आहेत मात्र, त्यांना पालनपोषणाद्वारे मुले कशी दत्तक घेता येतील याचे नियम माहित नसल्याचे सांगितले. जोपर्यंत या स्वनाथ शब्दाची जाणीव व महत्व समाजाला कळत नाही, तोपर्यंत दत्तक घेणे आणि पालनपोषण यातील फरक लोकांना समजणार नाही असे ते म्हणाले. दरम्यान विवेकानंद एज्युकेशन सोसायटी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट संस्थेच्या वतीने दरवर्षी दोन मुलांना अभ्यासासाठी दत्तक घेण्याचे घोषित केले. अनाथ विद्यार्थ्यांच्या राहण्यापासून ते अभ्यासापर्यंतच्या सर्व सोयी उपलब्ध करून देणार आहे.
मुंबई येथील चेंबुरच्या विवेकानंद एज्युकेशन सोसायटी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट येथे दोन दिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. कार्यक्रमाला विवेकानंद एज्युकेशन सोसायटीचे डॉ. प्रकाश लुल्ला, डॉ. सतीश मोढ , मिहीरजी घोटीकर उपस्थित होते. सारिका महोत्रा यांनी आभार व्यक्त केले.
बॉक्स
स्वनाथ फाउंडेशन ही भारतातील सर्व प्रथम संस्था असून अनाथांच्या पालनपोषण संबंधी संशोधन आणि डाटा संकलनाच्या आधारे काम करत आहे. ह्या संस्थेची स्थापना २०१९ मध्ये सुरू झाली असून गेल्या साडेचार वर्षांत संस्थेचा १६-१७ राज्यांमध्ये संपर्क आहे. सध्या उत्तराखंड, आसाम आणि महाराष्ट्रात सक्रिय काम सुरू आहे.


0 comments: